वाढता खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती उत्तम पर्याय

Posted On Thursday August 30th, 2018
Zero Budget Farming

शिर्डी, दि. 30 :- शेतीच्या सर्वांगिण विकासासाठी नैसर्गिक शेती हा महत्वाचा पर्याय असून, कृषि क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्या सोडविण्याबरोबरच शेतीतील वाढता खर्च कमी करण्यासाठी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती तसेच विषमुक्त शेती’ महत्वाचा पर्याय असल्याचे प्रतिपादन महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘झिरो बजेट नैसर्गिक (अध्‍यात्मिक) शेती तसेच विषमुक्त शेती’ या प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमाप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थाचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कृषी ऋषी पद्यश्री सुभाष पाळेकर, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.

महसुलमंत्री श्री. पाटील म्हणाले, शेती हा विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदु असुन, आज शेतीला विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतीमधुन जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विविध ठिकाणी शेतकरी नाविण्यपूर्ण प्रयोग करत आहेत. ही देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषि विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालावे, कृषि विभागाचा लौकिक वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षण देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे.

युवकांमध्ये शेतीबाबत आवड निर्माण होऊन, युवकांनी शेतीकडे वळणे गरजेचे आहे. आज शेतीमध्ये विविध रासायनिक खते व औषधांसाठी मोठा खर्च करुन जमीनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे कमीत कमी खर्च करुन जास्ती जास्त उत्पन्न व जमीनीचा पोत टिकविण्यासाठी नैसर्गि‍क शेती उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासनाने गेल्या चार वर्षांच्या काळात विविध कृषि योजना राबविल्या असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मी शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या समस्येची जाणीव आहे. आज महाराष्ट्रात काही जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे तेथील पिक पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सांगून, राज्य शासन शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. पाळेकर यांच्या कृषिविषयक कार्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला. यावेळी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.