कार्यावर दृष्टिक्षेप

इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी समन्वयाने तोडगा काढणार

इचलकरंजी शहरासाठी शासनाच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या वारणा पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन करून समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

वारणा पाणीपुरवठा योजनेसंबंधी आज मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, वारणा योजना विरोधी कृती समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर, स्थानिक आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार विनय कोरे, वारणा योजना कृती समितीच्या सदस्य तथा इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी आदींसह वाराणा योजना विरोधी समिती व वारणा योजना कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेसंदर्भात समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात येईल. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी या समितीसमोर योजनेचे सादरीकरण करतील. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून व मा. मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.

यावेळी विनय कोरे, स्थानिक आमदार श्री. हाळवणकर, ज्येष्ठ नेते. प्रा. एन.डी. पाटील, स्थानिक आमदार उल्हास पाटील यांनी योजनेसंदर्भातील मते व्यक्त केली.

दरम्यान, वारणा पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी झालेल्या विरोधानंतर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामास वेग

मुंबई, दि.१ : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील लेटर ऑफ एक्सेप्टन्स आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारकाचे काम करण्यासाठी नेमलेल्या एल अँड टी कंपनीला देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे. यासाठी कंपनीने काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी एल अँड टी कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश व सुशांत शहादेव यांच्याकडे हे पत्र सुपूर्द केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे, मुख्य सचिव सुमित मलिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण श्री. आशिषकुमार सिंह यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या १५ वर्षापासून छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. हे सरकार आल्यानंतर आमदार विनायकराव मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत या स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड टी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. जागतिक किर्तीचे हे स्मारक होणार असून एल अँड टी कंपनीला या कामामुळे वेगळी उंची प्राप्त होणार आहे. कंपनीने पावसाळ्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करावे. तसेच अतिशय वेगाने संपूर्ण स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी कालावधीत जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कामही कंपनीला करण्यास मिळाले आहे. स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी व सर्व परवाने मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत घेतली आहे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचे काम करू शकतो हे जगाला दाखवून द्यावे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

श्री. मेटे म्हणाले की, भावी पिढीस प्रेरणा मिळावी व मार्गदर्शन व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू होता. जगातील अद्वितीय व एकमेव असे हे स्मारक होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने या स्मारकासाठी अतिशय तत्परतेने काम करत सर्व परवाने मिळविल्या आहेत. स्मारकाचा अतिशय सुंदर आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मारकाचा गौरवपूर्ण उल्लेख पुढील काळात देशाचा नकाशात होईल.

पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचे काम जलदगतीने सुरु व्हावे यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी तत्परतेने काम पूर्ण केले. जगातील आगळावेगळा पुतळा येथे उभारण्यात येणार आहे. हे स्मारक म्हणजे सर्वोकृष्ट पर्यटन केंद्र होणार आहे. जागतिक किर्तीच्या या स्मारकामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळून रोजगार संधी निर्माण होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम कमी खर्चात व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केला.

एल अँड टी कंपनीचे संचालक श्री. सतीश म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम करण्यास मिळणे हे आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असून हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दूरदृष्टिकोन ठेवून कामे सुरू केली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी

मुंबई, दि. 31 : कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथिगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीस महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडीक, राजेश क्षीरसागर,माजी मंत्री आमदार सतेज पाटील, महापौर स्वाती येवलुजे, मुख्य सचिव सुमित मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान आशिषकुमार सिंह, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्ट्रिकल वाहने वापरण्यात यावीत. तसेच भक्त निवासामध्ये सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी. तसेच मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी. जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहिल. तसेच मंदिरा निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी.

विकास आराखड्यातील कामांवर संनियंत्रणासाठी पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महानगपालिका आयुक्त श्री. चौधरी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. हा परिसर विकास आराखडा 80 कोटीं आहे. यामध्ये मंदिर परिसरात सुमारे साडेबाराशे भाविक क्षमतेचे दर्शन मंडप (8.73 कोटी) उभारण्यात येणार असून त्यामध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आदी असणार आहे. व्हिनस कॉर्नरजवळ 8500 चौ.मी. क्षेत्रावर भक्त निवास (21.48 कोटी) उभारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये 138 खोल्या, 10 सूट, 18 हॉल (डॉरमेटरी) असणार आहेत. तसेच 240 क्षमतेचे बहुमजली वाहनतळ (11.03 कोटी), डायनिंग हॉल, समुदाय, दुकाने आदींचाही समावेश यामध्ये आहेत. बिंदु चौक (4.89 कोटी) येथे 4841 चौ.मी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येमार असून यामध्ये 170 चारचाकी व 315 दुचाकी पार्क करण्याची याची क्षमता आहे. तर सरस्वती थिएटर (7.01 कोटी) येथे 2200 चौ.मी. क्षेत्राचे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून याध्ये 140 चारचाकी व 145 दुचाकी क्षमता आहे. याशिवाय मंदिरा भोवताली पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग (2.65 कोटी), शहरात दिशादर्शक फलक (0.06 कोटी), शौचालय, पिण्याचे पाणी आदी सार्वजनिक सुविधा (1.87 कोटी), मंदिरच्या आसपास क्षेत्राचे सौंदर्यीकरण (0.94 कोटी), आपत्ती व्यवस्थापन सुविधा (1.60 कोटी), , सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी (1.31 कोटी), सेवा वाहिनी स्थलांतर (2.91 कोटी),आरोग्य सुविधा (52 लाख) आदींचा विकास आराखड्यात समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना राबविणार

मुंबई, दि. 23 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान या नावाने तीन व्याज परतावा योजना व शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची तंत्रकौशल्य योजना येत्या 2 फेब्रुवारीपासून राबविण्यात येणार असून या सर्व योजना ‘महास्वयंम’ या संकेतस्थळावरून राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज येथे दिली.

सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भातील कार्यवाहीसाठी नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित झाली. यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. निलंगेकर, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक सुचिता भिकाणे आदी यावेळी उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मागास समाजातील तरुणांसाठी व्याज परताव्याच्या तीन योजना राबविण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के पर्यंतचा व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून देण्यात येणार आहे. कर्जाची मर्यादा १० लाखापर्यंत आहे. तर दुसरी योजनेत बचत गट, संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी यांना गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये गटांने घेतलेल्या कर्जाचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येणार आहे. तिसऱ्या योजना शेतकरी उत्पादक गटांसाठी असून गट प्रकल्प कर्ज योजनेतून बिनव्याजी दहा लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तंत्रकौशल्य योजना राबविण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक तंत्र शिक्षण देण्यात येणार आहे.

वरील चारही योजनांची सुरुवात येत्या २ फेब्रुवारीपासून होणार असून या सर्व योजना www.mahaswayam.in या संकेतस्थळामार्फत राबविण्यात येणार असल्याचे श्री. निलंगेकर पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजातील तरुणांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून त्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महामंडळास कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारत्मक – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई – ४ जाने. २०१८- कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यासंदर्भातला अहवाल येत्या १५ दिवसात राज्य सरकार समोर सादर होणार असून सरकार कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळवून देण्याबाबत सकारात्मक आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मंत्रालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्या विविध मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी श्री चंद्रकांत पाटील यांनी हि माहिती दिली.
 

कोतवाल संघटनेच्या विविध मागण्या आहेत त्यापैकी कोतवालांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा व त्यानुसार द्येय असलेले वेतनभत्ते मिळावेत ही प्रमुख मागणी होती. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे पदाधिकारी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात याविषयी सकारात्मक चर्चा पार पडली आणि कोतवाल संघटनांच्या मागण्यांना लवकरच न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

जळगाव ते मुंबई विमानसेवा २३ डिसेंबर पासून सुरु होणार

 
जळगाव, दि. 13 – जळगावकरांचे विमानसेवेचे कित्येक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार असून येत्या 23 डिसेंबरला जळगावहून मुंबईकडे पहिले विमान उडाण होणार असल्याची माहिती राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.
 
केंद्र शासनाच्यावतीने देशातील प्रमूख शहरे विमान सेवेने जोडण्यासाठी उडाण (उडे देशका आम नागरीक) योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील दहा शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगावचा समावेश करण्यात आला आहे. एअर डेक्कन (AIR DECCAN) या विमान कंपनीने यासंबंधात पुढाकार घेतला असून जळगाव येथून विमानसेवा सुरु करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जळगाव येथून पहिले विमान मुंबईच्या दिशेने 23 डिसेंबर रोजी झेपावणार असून जळगावकरांचे कित्येक वर्षापासूनचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही विमानसेवा सोमवार वगळता उर्वरीत दिवशी दररोज सुरु राहणार आहे. या विमानसेवेमुळे जळगावकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार असून अवघ्या दीड तासात मुंबईला पोहोचता येणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे.
 
मुंबईहून विमान दररोज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी जळगांवसाठी उड्डाण करुन ते जळगांव येथे सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर जळगांव येथून विमान दर मंगळवार, बुधवार व रविवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी उड्डाण करेल व मुंबई येथे दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी पोहचेल. तर दर गुरूवार, शुक्रवार व शनिवारी विमान जळगांव येथून दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी निघून मुंबई येथे दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.
 
एअर डेक्कन (AIR DECCAN) कंपनीचे हे विमान बी 1900 डी प्रकारचे एअरक्राफ्ट असुन याची प्रवासी क्षमता 19 इतकी असणार आहे. जळगाव-मुंबई या विमानसेवेची जिल्हा प्रशासनातर्फे व विमान प्राधिकरणातर्फे पूर्वतयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नवीन वर्षात नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करण्यासाठी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

जळगाव, दि. 4 – नवीन वर्षात जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करावयाचे असल्याने येत्या एक महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृहाची अपूर्ण कामे पूर्ण करा. अशा सुचना राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी शहरातील महाबळ परिसरात बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत आमदार स्मिताताई वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार अमोल निकम, कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, उदय वाघ, भरत अमळकर यांचेसह सार्वजनिक विभागाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.
 
यावेळी पालकमंत्र्यांनी नाट्यगृहाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.तसेच अपूर्ण असलेल्या कामांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारास दिल्यात. सद्यपरिस्थितीमध्ये शहरातील नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रीकची व रंगरंगोटीची कामे सुरु असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिले.
 
नवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करुन पहिले दहा प्रयोग नाममात्र फी घेऊन नाटय रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

जगभरातील साडेचारशेहून अधिक कंत्राटदारांचा उत्कर्ष महामार्गाच्या ‘वेबिनार’मध्ये सहभाग

मुंबई, दि. 5 : हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलच्या सुधारित तत्वानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘उत्कर्ष महामार्ग’ योजनेद्वारे राज्यातील दहा हजार किमी रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील साडेचारशेहून अधिक रस्ते बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी या कंत्राटदारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
 
‘उत्कर्ष महामार्ग’ अंतर्गत राज्यातील 10 हजार किमीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलच्या सुधारित तत्वांना मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 30 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पन्नास ते शंभर किमी रस्त्याचे एक प्रकल्प अशा सुमारे दीडशेहून अधिक प्रकल्पांची कामे होणार आहेत. या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या कंत्राटदारांनी सहभागी व्हावे व त्यांना या योजनेमध्ये कोणतीही शंका राहू नये, यासाठी आज मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये राज्यासह जगभरातील विविध देशातील कंत्राटदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबचॅट तसेच इमेलद्वारे सहभागी झाले होते. भारताबाहेरील दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लड आदी सात देश, भारतातील 18 राज्ये व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अशा सुमारे साडेचारशेहून अधिक कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता.
 
रस्त्यांचा दर्जा उत्तम रहावा, त्यांची देखभाल नियमित व्हावी, यासाठी हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलअंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यासाठी जगभरातील उत्तम व नामांकित कंत्राटदारांनी सहभागी व्हावे, यासाठी राज्यात प्रथमच वेबिनार ही संकल्पना राबविण्यात आली. पहिल्यांदाच राबविलेल्या या संकल्पनेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
 
या योजनेची व्याप्ती, वित्तीय सहकार्य, बँकेचे सहकार्य, प्रकल्प आराखडा, कामांचे वाटप, सुरक्षा अनामत, देयकांचा परताव्याची पद्धत अशा विविध बाबींसह तांत्रिक गोष्टींसंबंधीच्या शंकांना यावेळी मंत्री श्री. पाटील व श्री. आशिषकुमार सिंह यांनी उत्तरे दिली. यावेळी सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) ए.ए. सगणे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सातारा जिल्ह्यातील रस्ते 15 डिसेंबरपूर्वी खड्डे मुक्त करणार

सातारा, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गात असलेले खड्डे 15 डिसेंबर पूर्वी पूर्ण करा. ते खड्डे व्यवस्थीत भरल्याची खात्री करुन तसा अहवाल पाठवावा, त्याचे चित्रीकरणही केले जावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या.
 
सा. बां. विभागातील अभियंत्यांसमवेत खड्डेमुक्त रस्ते अभियान, इमारती व रस्त्यांची प्रलंबित कामे व क्षेत्रीय स्तरावरील कार्यपध्दतीच्या सविस्तर आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी.एम. किडे, अधीक्षक अभियंता एस.एस. माने, कार्यकारी अभियंता एस.डी. सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांची एकूण लांबी 3 हजार 339 कि.मी. असून यापैकी सुमारे 2 हजार 500 कि.मी. लांबीत खड्डे पडलेले असून 15 नोव्हेंबर पर्यंत 718 कि.मी लांबीतील खड्डे भरले असल्याचे माहिती अधीक्षक अभियंता एस.एस. माने यांनी बैठकीत दिली.
 
जिल्ह्यामध्ये एकूण 80 युनिट कार्यरत असून याद्वारे खड्डे भरण्याचे काम प्रगती असून कामाची प्रगती कायम ठेवावी, अशा सूचना करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, दि. 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यमार्गावरील सर्व खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी व दि. 15 डिसेंबर 2017 पूवी प्रमुख जिल्हा मार्गावरील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंते उपथित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना अभिनेते अक्षयकुमार यांच्याकडून 25 हजाराची भेट

कोल्हापूर दि. 20 : अभिनेते अक्षयकुमार यांनी 103 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला 25 हजाराचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली आहे. यापैकी 39 धनादेशांचे वितरण कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात दोन शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना घरी भेट देवून सुरुवात करण्यात आली.

 

कसबा बावडा येथील करवीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या दिलीप संकपाळ (वय 49) यांचे कर्तव्यावर असतानाच ह्दय विकाराचा झटका येवून निधन झाले होते. त्यांच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून अक्षयकुमार यांनी पाठविलेला धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे दिला. तसेच यावेळी त्यांच्या मुलांसाठी मिठाई दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी अक्षय कुमार यांनी स्वाक्षरीने पाठविलेल्या पत्रही वाचून दाखविले. यावेळी पत्नी सुभद्रा संकपाळ, आई इंदुबाई संकपाळ, मुलगी श्वेता संकपाळ आदी उपस्थित होते.

 

कसबा बावडा लाईन बाजार येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय 44) यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला व त्यातच ह्दय विकाराने निधन झाले. त्यांच्याही घरी भेट देवून पालकमंत्र्यांनी अक्षयकुमार यांच्याकडून आलेला धनादेश व मिठाई दिली आणि त्यांचे पत्रही वाचून दाखविले. यावेळी त्यांच्या पत्नी रुपाली जाधव, मुले स्नेहल व प्रतिक आणि आई हौसाबाई जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी स्नेहल जाधव यांच्याशी अक्षयकुमार यांनी स्वत: दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही कुटुंबियांना यावेळी आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

अभिनेते अक्षयकुमार यांनी आपल्या पत्रामध्ये व्यक्त केलेल्या भावना अशा-आपल्या घरातील शूर शहीद विराने देशासाठी बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पन करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती. सदैव आपल्या ऋणात असणारा आपला अक्षयकुमार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत