कार्यावर दृष्टिक्षेप

इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी समन्वयाने तोडगा काढणार

इचलकरंजी शहरासाठी शासनाच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या वारणा पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन करून समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

वारणा पाणीपुरवठा योजनेसंबंधी आज मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, वारणा योजना विरोधी कृती समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर, स्थानिक आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार विनय कोरे, वारणा योजना कृती समितीच्या सदस्य तथा इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी आदींसह वाराणा योजना विरोधी समिती व वारणा योजना कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेसंदर्भात समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात येईल. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी या समितीसमोर योजनेचे सादरीकरण करतील. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून व मा. मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.

यावेळी विनय कोरे, स्थानिक आमदार श्री. हाळवणकर, ज्येष्ठ नेते. प्रा. एन.डी. पाटील, स्थानिक आमदार उल्हास पाटील यांनी योजनेसंदर्भातील मते व्यक्त केली.

दरम्यान, वारणा पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी झालेल्या विरोधानंतर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.