जळगाव ते मुंबई विमानसेवा २३ डिसेंबर पासून सुरु होणार

Posted On Thursday December 21st, 2017
First flight to take off from December, Jalgaon

 
जळगाव, दि. 13 – जळगावकरांचे विमानसेवेचे कित्येक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार असून येत्या 23 डिसेंबरला जळगावहून मुंबईकडे पहिले विमान उडाण होणार असल्याची माहिती राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.
 
केंद्र शासनाच्यावतीने देशातील प्रमूख शहरे विमान सेवेने जोडण्यासाठी उडाण (उडे देशका आम नागरीक) योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील दहा शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगावचा समावेश करण्यात आला आहे. एअर डेक्कन (AIR DECCAN) या विमान कंपनीने यासंबंधात पुढाकार घेतला असून जळगाव येथून विमानसेवा सुरु करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जळगाव येथून पहिले विमान मुंबईच्या दिशेने 23 डिसेंबर रोजी झेपावणार असून जळगावकरांचे कित्येक वर्षापासूनचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही विमानसेवा सोमवार वगळता उर्वरीत दिवशी दररोज सुरु राहणार आहे. या विमानसेवेमुळे जळगावकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार असून अवघ्या दीड तासात मुंबईला पोहोचता येणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे.
 
मुंबईहून विमान दररोज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी जळगांवसाठी उड्डाण करुन ते जळगांव येथे सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर जळगांव येथून विमान दर मंगळवार, बुधवार व रविवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी उड्डाण करेल व मुंबई येथे दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी पोहचेल. तर दर गुरूवार, शुक्रवार व शनिवारी विमान जळगांव येथून दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी निघून मुंबई येथे दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.
 
एअर डेक्कन (AIR DECCAN) कंपनीचे हे विमान बी 1900 डी प्रकारचे एअरक्राफ्ट असुन याची प्रवासी क्षमता 19 इतकी असणार आहे. जळगाव-मुंबई या विमानसेवेची जिल्हा प्रशासनातर्फे व विमान प्राधिकरणातर्फे पूर्वतयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.