‘शेतकरी सन्मान भवन’ – कृषि विभागाची सर्व कार्यालये एकाच इमारतीत येणार

Posted On Friday June 14th, 2019
Shetkari Sanman Bhavan

कोल्हापूर, दि. 13 : कृषि विभागाची विविध खाती विविध इमारतीमध्ये असतात. त्यामुळे शेतीच्या कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांची अनेकदा ओढातान होते. हे टाळण्यासाठी कृषिची विविध कार्यालये एकाच इमारतीत करण्याचा अनेक दिवस प्रयत्न सुरु होता. या प्रशासकीय इमारतीसाठी कृषि महाविद्यालयाने तीन एकर जागा दिल्याने शेतकरी सन्मान भवन उभारता येत आहे. वर्ष-दिड वर्षात या ठिकाणी काही कार्यालयचे सुरु होतील. या इमारतीत शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल. राहुरी कृषि विद्यापीठाप्रमाणेच याठिकाणी एक असे सेंटर असेल ज्यामध्ये नव नवीन बियाणांचे संशोधन, खते, बियाणे यांची माहिती मिळेल व विक्रीही होईल. वर्षभरात 600 शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करुन त्यांना त्यांचे उत्पादन विक्रीची संधी देता येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी सन्मान भवन अत्यंत उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर मुख्यालयी उभारण्यात येत असलेल्या कृषि विभागाच्या शेतकरी सन्मान भवन या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा हा शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी अत्यंत प्रगत जिल्हा असून कृषि विभागाच्या विविध योजना परिणामकारमपणे राबविण्यासाठी व शेतकऱ्यांना अद्यावत कृषि तंत्रज्ञान व सुविधा एकत्र उपलब्ध होण्यासाठी शहरातील कृषि विभागाची सर्व कार्यालये एकत्र आणण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकत्र उपलब्ध होण्यासाठी सदरचे शेतकरी सन्मान भवन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. हे भवन उभारण्यासाठी 29 कोटी 80 लाख रुपये शासन मान्यता प्राप्त झालेली आहे.