सातारा जिल्ह्यातील रस्ते 15 डिसेंबरपूर्वी खड्डे मुक्त करणार

सातारा, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गात असलेले खड्डे 15 डिसेंबर पूर्वी पूर्ण करा. ते खड्डे व्यवस्थीत भरल्याची खात्री करुन तसा अहवाल पाठवावा, त्याचे चित्रीकरणही केले जावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या.
सा. बां. विभागातील अभियंत्यांसमवेत खड्डेमुक्त रस्ते अभियान, इमारती व रस्त्यांची प्रलंबित कामे व क्षेत्रीय स्तरावरील कार्यपध्दतीच्या सविस्तर आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी.एम. किडे, अधीक्षक अभियंता एस.एस. माने, कार्यकारी अभियंता एस.डी. सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांची एकूण लांबी 3 हजार 339 कि.मी. असून यापैकी सुमारे 2 हजार 500 कि.मी. लांबीत खड्डे पडलेले असून 15 नोव्हेंबर पर्यंत 718 कि.मी लांबीतील खड्डे भरले असल्याचे माहिती अधीक्षक अभियंता एस.एस. माने यांनी बैठकीत दिली.
जिल्ह्यामध्ये एकूण 80 युनिट कार्यरत असून याद्वारे खड्डे भरण्याचे काम प्रगती असून कामाची प्रगती कायम ठेवावी, अशा सूचना करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, दि. 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यमार्गावरील सर्व खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी व दि. 15 डिसेंबर 2017 पूवी प्रमुख जिल्हा मार्गावरील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंते उपथित होते.