गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली

Posted On Friday August 18th, 2017
Road Inspection : 'Sion-Panvel Highway' and 'Mumbai-Goa Highway'

अलिबाग,दि.17,(जिमाका):- गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठया प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान आज सकाळी राज्याचे महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम(सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी आज या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी सायन ते पनवेल महामार्ग, तेथून पुढे पळस्पे फाटा येथून वडखळ मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांचे समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधानसचिव आशिष सिंग, सचिव सी.पी.जोशी, सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाचे मुख्य अभियंता श्री. केडगे, विशेष प्रकल्प अधिक्षक आर.टी. पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजीव सिंग व प्रशांत फेगडे आदी वरीष्ठ अधिकारी तसेच स्थानिक बांधकाम व महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी पळस्पे फाटा मार्गे जितेगाव, वडखळ, नागोठणे, वाकण फाटा मार्गे पाली ते खोपोली रोड या मार्गाची पाहणी केली. पनवेल व पाली येथील विश्रामगृहावर थांबून त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.

यावेळी त्यांनी कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर रस्ते डागडुजीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच २२ तारखेच्या आत ही कामे पूर्ण होतील या पद्धतीने नियोजन करावे, अशा सुचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ना. चंद्रकांत पाटील यांनी आज समक्ष सकाळी ६.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.०० पर्यंत सायन- पनवेल, पनवेल ते इंदापूर- वाकण- पाली ते खोपोली या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली.