“राम”, “राजा राम” आणि “राम-राम”

Posted On Monday May 6th, 2019
Ram Navami & Lok Sabha Election 20019

‘राम’ या एकाच शब्दाचे किती तरी अर्थ आपल्या समृद्ध अशा मायमराठीत आहेत ना? म्हणजे बघा ना, राम म्हणजे तसं एक नाव आहे, पण आयुष्य जगण्याचा हा एक संस्कार आहे, एक तत्वज्ञान आहे. अयोध्येचा राजा राम या नावाचा प्रजापती असाही लौकिक आहे. खऱ्या अर्थाने लोकराज्य म्हणजेच रामराज्य होय. “राम” हा शब्द इंग्रजीत लिहिला, तर त्या RAM ला संगणकीय परिभाषेत आणखी एक वेगळा अर्थ आहेच. असा हा रामनामाचा महिमा… अर्थात ही रामकथा मी सांगतोय त्याचं कारण म्हणजे यंदाची रामनवमी आणि लोकसभेसाठी नुकतेच पार पडलेले मतदान. मी अयोध्येतील, राम मंदिराबाबत बोलतो, असंच तुम्हाला वाटेल. पण तसं अजिबातच नाहीये…

काय झालं, ते तुम्हाला सविस्तर सांगतोच. देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वाहणारे वारे आणि निवडणूक म्हटली प्रचार करण्यासाठी राजकीय नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढणंही आलंच. त्याला मीसुद्धा अपवाद नाही. मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करतो, त्या पक्षाच्या प्रचारात मीसुद्धा सक्रीय सहभागी राहून बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करत असताना रामनवमीच्या दिवशी मला एका नितांतसुंदर सोहळ्याचा साक्षीदार होता आलं. त्याचीच ही गोष्ट आहे…

आपला देश विविधतेतील एकात्मतेसाठी ओळखला जातो. कला, सण, उत्सव अशा समृद्ध ऐतिहासिक वारशाची देणगीच आपल्या देशाला लाभलेली आहे. आपला महाराष्ट्रही त्यात मागे नाही. विविध उत्सव, सण साजरा करणारा मराठी माणूस हा तसा उत्सवप्रियच. त्यातही प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या सण-उत्सवांची गोष्ट न्यारीच. शहरी भागात आज वेळेच्या अभावी सण साजरे करण्याच्या पद्धतीत आधुनिकतेचा साज चढला आहे. खेड्यात अजूनही सण, त्या निमित्तानं निघणाऱ्या यात्रा आणि भरणाऱ्या जत्रा, असं सगळं पारंपारिक पद्धतीत सुरू आहे. अध्यात्म, मनोरंजन, प्रबोधन असं सगळंच काही देणाऱ्या या जत्रा-यात्रा ग्रामीण भागाचं मुख्य आकर्षण असून त्यामागे अर्थकारणही आहे.

तर प्रचाराच्या रणधुमाळीचा एक फायदा असा झाला की, याच मोसमात निघणाऱ्या विविध यात्रा आणि जत्रांनाही हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. लहानपणी वडीलधाऱ्यांचं बोट धरून ज्या यात्रा-जत्रांना गेलो होतो, त्याच्या आठवणीही या निमित्तानं ताज्या होत आहेत. यंदाच्या रामनवमीच्या दिवशी आम्ही गेलो होतो भोर या गावी. आता पुणे जिल्ह्यातलं हे गाव सुप्रसिद्ध आहेच. भोरच्या रामनवमी उत्सवाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी मला लाभली.

भोर हे, तालुक्याचं ठिकाण आहे. भोर हे स्वतंत्र संस्थानही होतं. या संस्थानाचा कारभार शंकरजी नारायण यांच्याकडे छत्रपती राजाराम महाराज यांनी सन १६९७ मध्ये सोपवला होता. पंतसचिव या नात्यानं त्यांनी संस्थानाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली होती. भोर हेच राज्याच्या राजधानीचंही ठिकाण होतं. साहजिकच भोरमध्ये राजवाडाही होता. होताच नव्हे, तर पुण्यापासून फक्त ५१ किलोमीटरवर असलेल्या भोरमध्ये तुम्हाला जुन्या वैभवाची आठवण देणारा राजवाडा आजही बघायला मिळू शकेल. प्राचीन भारतीय आणि युरोपियन बांधकाम शैलींवर या राजवाड्याचं बांधकाम आहे. राजवाड्यासमोर कारंजी आहेत आणि रामनवमीसारख्या उत्सवांच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर झूल पांघरलेला हत्ती झुलायचा, अशा वैभवशाली आठवणी जुने-जाणते सांगतात.

या राजवाड्यातच रामाचं पुरातन मंदिर आहे. मूळ राजवाडा रामनवमीच्या उत्सवातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे शेजारीच हा नवा राजवाडा १८६९मध्ये बांधण्यात आला. तेव्हा यासाठी दोन लाख रुपये खर्च आल्याचं इतिहास सांगतो. रामनवमीच्या निमित्तानं या राजवाड्यात रामजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. भोर संस्थांनाचे मूळ पंतसचिव असलेल्या नारायण यांच्या वारसांकडेच आजही रामाला पाळण्यात घालण्याचा मान आहे. आज भोर सोडून बाहेर पडलेली, राज्य-देशाच्याही सीमा ओलांडून गेलेली ही मंडळी या सणाच्या निमित्तानं आवर्जून एकत्र येतात. इतकंच नव्हे, तर प्रामुख्यानं आपल्या पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी होत आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेत आहेत, हा एक अविस्मरणीय अनुभव होता. शिमगा-गणपतीला कोकणातला चाकरमानी नित्यनेमानं आपल्या गावी हजर असतो, त्याचीच मला या निमित्तानं आठवण झाली.

या राजवाड्याच्या मध्यवर्ती चौकात रामजन्माचा सोहळा होतो. पहिल्या मजल्याचे सज्जेही या वेळी गर्दीनं फुललेले होते. अनेक स्त्री पुरुष आपला पारंपारिक वेष परिधान करून आले होते. दुपारी ठीक बारा वाजता रामाला पाळण्यात घालण्यात आलं आणि ढोल-ताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात प्रभू श्रीरामजन्मोत्सव झाला. अत्यंत उत्साही आणि भक्तिभावानं भारलेलं हे वातावरण कसं होतं, सांगायचं तर अद्भुत… इतका एकच शब्द मला सुचतोय. बाकी, हा अनुभव तुम्ही याचि देहि याचि डोळा घेणंच उत्तम…!

रामनवमीच्याच दिवशी या गावात जानुबाई देवीची यात्राही असते. यात्रेनिमित्तानं जत्राही भरते आणि कुस्त्यांचा जंगी फडही असतोच. मग? आपल्या या सण-उत्सव, परंपरांची ओळख तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही करून देणार ना? पुढची रामनवमी भोरला, हे आत्ताच ठरवून टाका…

हा सोहळा संपल्यानंतर आम्ही याच तालुक्यातल्या बांडेवाडी गावच्या यात्रेला निघालो. आपल्या संस्कृतीत अनपेक्षितपणे जर कुणा परिचित व्यक्तीची भेट झाली तर रामराम म्हणून एकमेकांची विचारपूस करतात; इतकच नव्हे तर अपरिचित वाटसरू देखील एखाद्या गावकऱ्याशी संवाद साधताना ओघाने रामराम म्हणतो. बांडेवाडी गावच्या यात्रेमध्ये बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया ताईंची झालेली भेट देखील या प्रथेला अपवाद नव्हती. थोडक्यात रामनामाच्या माळेत आपलं सर्वांचं जीवन गुंफले आहे.

रामराम !