राहीबाई, आता अधिक जोमानं काम करतील…

पृथ्वी सूर्याला प्रदक्षिणा घालताना स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते, हे विज्ञानाने आपल्याला सांगितलंच आहे. पण मानवी आयुष्याचं पण काहीसं तसंच आहे. आपणही आपल्याभोवती एक प्रदक्षिणा घालताना जणू जिथून सुरुवात केली होती, तिथेच परत येतो. यासंदर्भात प्रामुख्याने शेतीचंच उदाहरण घ्या ना… आपण पारंपरिक शेती करता करता आधुनिक शेती, संकरित बियाणं, अधिक उत्पन्न देणारी वाणं असं सगळं करता करता पुन्हा सेंद्रिय शेती किंवा आजच्या भाषेत ऑर्गनिक फार्मिंगकडे वळलोच ना… आधुनिक शेतीतील गोष्टी बऱ्या किंवा वाईट असं सांगण्या-ठरवण्याचा हा प्रयत्न नाही. पण आपण चक्राकार फिरून, प्रदक्षिणा घालून परत एकदा सुरुवात केली तिथेच परतलो आहोत, हेसुद्धा नाकारता येणार नाही…
म्हणूनच आजच्या युगात राहीबाई पोपेरेंसारखी महिला आणि त्यांचं कार्य या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या ठरतात. पारंपरिक बियाणं जतन करण्याची त्यांची दूरदृष्टी आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या दोन्ही गोष्टी अद्वितीयच म्हणाव्या लागतील. राहीबाई आहेत पोपेरेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी. सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित जगातल्या निकषांनुसार त्या खरं तर अशिक्षितच. पण त्यांनी केलेलं काम हे डोंगराएवढं आहे. लौकिकार्थानं सुशिक्षित नसल्या, तरीही राहीबाईंचा एक विचार आणि तो आचरणात आणण्याची त्यांची तळमळ शिक्षित जगालाही मार्गदर्शक किंवा खरं तर पथदर्शकच ठरायला हवी.
अनेक पुरस्कारांनी गौरव झालेल्या राहीबाईंबद्दल नव्यानं सांगण्याची खरं तर काहीच गरज नाही. पण पारंपारिक बियाणांचं जतन करण्याची किंवा अशा बियाणांची बँक तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात कुठून आली असावी? आज हायब्रीड किंवा तत्सम बियाणांचे दुष्परिणाम जगासमोर येत आहेत. या बियाणांचा वापर करून प्रामुख्याने भले पीक जास्त येत असेल, आर्थिक फायदा होत असेलही… पण साकल्याने किंवा लाँग टर्म म्हणतो तसा विचार केला, तर त्याचे अनेक तोटेही आहेत. हे तोटे दृश्य स्वरुपात येण्यापूर्वीच राहीबाईंनी त्यांचे बियाणांच्या बँकेचं काम सुरू केलंही होतं. या गोष्टीबद्दल त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तितकं थोडंच नाही का? एक शेतकरी म्हणून कृषिक्षेत्र हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहेच. त्यामुळेच पारंपरिक बियाणांचा वापर करूनच शेती केली जावी, ही त्यांची धडपड वाखाणण्याजोगीच वाटते. पारंपरिक बियाणांचा वापर करून येणाऱ्या पिकातून पुढील लागवडीसाठी बियाणं उपलब्ध होतं, हे शेतकऱ्यांना माहिती नसण्याचं काहीच कारण नाही. हायब्रीड बियाणांतून ते शक्य होत नाही, हेसुद्धा त्यांना अनुभवातून समजलेलं असणारच. परंतु, हे समजण्यासाठी निश्चितच काही काळ लागलाच असेल. नेमक्या त्याच कालावधीत राहीबाईंचं हे पारंपरिक बियाण्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम प्रामुख्यानं सुरू होतं. त्यामुळेच त्यांचं हे कार्य मोलाचंही ठरतं.
राहीबाईंना त्यांच्या या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेतच, पण एक पुरस्कार त्यांना मीही प्रदान करू शकलो, ही बाब मलाही समाधान देणारी आहे. हा पुरस्कार देताना पारंपरिक बियाणांची ही बँक चालवताना काय अडचणी येतायत, याची कल्पना त्यांनी दिली होती. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची आणि त्यांची व्यथा एकसमान होती आणि आहे… घाम शिंपून पीक घेणाऱ्या अनेक बळीराजांच्या शिरावर पक्क्या घराचं छप्पर नाही… अस्वस्थ करणारी ही व्यथा दूर करण्यासाठी आमचं सरकार योग्य ती पावलं उचलतंय आणि यापुढेही उचलेल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनमधून अनेक चांगले, सकारात्मक बदल घडले आहेत. कृषि क्षेत्रात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना आणि एचव्हीडीएससारखी काही पावलं आम्ही उचलली आहेत. आणखीही उचलली जातील याची मला खात्री आहे आणि तशी ग्वाहीच मी या निमित्ताने देतो… पण ती चर्चा करण्याचा हा प्रपंच नव्हे.
तर, राहीबाईंना पुरस्कार दिला खरा. पण त्या सोहळ्यातच त्यांनी मांडलेल्या व्यथेमुळे मनात एक अस्वस्थता आली होती. काय करता येईल, याचा विचार सतत डोक्यात सुरू होता. अखेर मी एक निर्णय घेतला… राहीबाईंना हक्काचं घर मिळवून द्यायचंच…
कार्याची दखल घेत देश-विदेशांतून येणाऱ्यांची उठबस राहीबाईंना करता येईल आणि बियाणांचं जतन करण्यासाठी परिपूर्ण व्यवस्था असेल असं एक घर. प्रामुख्याने त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशा प्रकारचीच या घराची रचना असावी, हा विचार सुनिश्चित करून मग त्यादिशेने प्रयत्न सुरू केले.
आज मला सांगायला आनंद होतो की, कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून राहीबाईंना पक्कं, त्यांच्या गरजा भागवणारं असं हक्काचं घर मिळालं आहे. त्यात कुठे तरी खारीचा वाटा का होईना उचलता आला, याचं मलाही निश्चितच समाधान आहे. आता राहीबाईंना त्यांचं काम अधिक जोमानं सुरू ठेवता येईल. त्यांच्या या कामाचा फायदा आज शेकडो-हजारोंना होत असेल, तर तो यापुढे लाखो-कोट्यवधींना व्हावा आणि हा माझा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच सुजलाम-सुफलाम, आरोग्यपूर्ण व्हावा…
माझ्यासारख्या शेतकऱ्याचं आभाळातल्या बापाकडे यापेक्षा जास्त काय मागणं असू शकेल?