गडहिंग्लज नगर पालिकेच्या हद्दवाढीला तत्त्वत: मंजुरी

Posted On Tuesday October 9th, 2018
Extension Of Gadhinglaj Municipal Corporation Sanctioned As Per The Principle

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीलगत असलेल्या बड्याचीवाडीचा परिसर नगरपालिकेत सामावून घेण्यास आज मा. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली. पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी एका शिष्ठमंडळासह सदर मागणीबाबत शासनाकडे आग्रह धरला होता.

गडहिंग्लज शहराच्या सभोवती असणाऱ्या 25 ते 30 वसाहती बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीत येतात. बड्याचीवाडी हे मूळ गाव गडहिंग्लज शहरापासून चार किमी अंतरावर आहे. सदर भाग हा गडहिंग्लज शहराच्या हद्दीला लागून असल्याने या भागातील नागरिकांना विविध बाबींसाठी शहरातच यावे लागते. तसेच, सदर भाग जिल्हा परिषद हद्दीत असल्याने या भागातील वसाहतीत पाणी, गटार, स्वच्छता, दिवाबत्ती इत्यादी नागरी सुविधांची व्यवस्था करणे, पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे बड्याचीवाडीचा काही भाग नगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली. यासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रस्तावित हद्दवाढीकरिता बड्याचीवाडी ग्रामपंचायतीनेही मान्यता दिली असल्याचे नगरविकासचे उपसचिव श्री मोघे यांनी मंत्रिमहोदयांना सदर बैठकीत सांगितले.

त्यानुसार, हद्दवाढीला तत्त्वत: मंजुरी देवून, पुढील कार्यवाहीच्या सूचना मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या हद्दवाढीमुळे बड्याचीवाडी ग्रामपंचायतीमधील सुमारे 6.25 स्क्वेअर किलोमीटर पैकी 4.6 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर गडहिंग्लज नगरपरिषदेला जोडला जाणार आहे.

या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर, गडहिंग्लज नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष उदय पाटील यांच्यासह गडहिंग्लज शहर हद्द वाढ कृती समितीचे सदस्य व सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.