नवीन वर्षात नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करण्यासाठी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

Posted On Thursday December 14th, 2017
Newly Renovated Drama Theaters, Jalgaon

जळगाव, दि. 4 – नवीन वर्षात जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करावयाचे असल्याने येत्या एक महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृहाची अपूर्ण कामे पूर्ण करा. अशा सुचना राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी शहरातील महाबळ परिसरात बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत आमदार स्मिताताई वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार अमोल निकम, कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, उदय वाघ, भरत अमळकर यांचेसह सार्वजनिक विभागाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.
 
यावेळी पालकमंत्र्यांनी नाट्यगृहाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.तसेच अपूर्ण असलेल्या कामांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारास दिल्यात. सद्यपरिस्थितीमध्ये शहरातील नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रीकची व रंगरंगोटीची कामे सुरु असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिले.
 
नवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करुन पहिले दहा प्रयोग नाममात्र फी घेऊन नाटय रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.