लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार

मुंबई : राज्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. त्यासोबतच लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री देखील आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, “देशात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन महाराष्ट्रात आचारसंहिता शिथील करावी, अशी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्याने आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यास कोणतीही अडचण नाही. पण तरीही पुनर्वसन विभागाचे काम माझ्याकडे असल्याने राज्यातील दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वत: राज्यभरात दौरे करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, “पशुधनासाठी मागेल त्या ठिकाणी चारा छावणी सुरु करण्याच्या तत्वावर राज्यात १२६४ चारा छावण्या कार्यन्वित करण्यात आल्या असून, या छावण्यांमध्ये आठ लाख ३२ हजार २९ जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन ९० रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन ४५ रुपये या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
त्याशिवाय, राज्यातील ३६९९ गावे व ८४१७ वाड्यांमध्ये ४७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच दोन लाख ७४ हजार मजुरांना शासनाच्या मागेल त्याला काम या तत्वावर मजुरी देऊन राज्यातील ३४ हजार ४३१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याशिवाय सुमारे १० लाख लोकांना मजुरी देण्याची तयारी आहे,” असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, या ठिकाणी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आठ ही उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावी केली जात आहे. पण तरीही नागरिकांना आणि पशुधनाला पिण्याचे मुबलक पाणी देण्याचे उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही दिल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.