मराठा मोर्चाचे प्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मराठाक्रांतीमोर्चा भायखळा येथून आझाद मैदानपर्यंत काढण्यात आला होता. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.
-
- मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी संवाद साधताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका आहे. तसेच आरक्षणासह अन्य मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या नियमित बैठका घेऊन आढावा घेण्यात येईल व त्याची पूर्तता करण्यात येईल.
- मराठा समाजाला इतर मागास वर्गाला मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती त्याच अटीच्या अधीन राहून मराठा समाजाला देण्यात येतील. त्यामध्ये ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश असेल.
- मराठा समाजाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे बांधण्यासाठी जागा देण्यात येईल, तसेच बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान शासन देईल.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या ३ लाख मुलांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी ४५० कोटीची तरतूद केली जाईल.तसेच प्रशिक्षित मुलांना रोजगार सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल व त्याचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येईल.
- मराठा समाजास आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठविला आहे. आयोगाचे काम करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाला सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विहित कालमर्यादेत अहवाल देण्याबाबत त्यांना कळविण्यात येईल.
- रक्ताच्या नात्यामध्ये एका व्यक्तीची जातवैधता पडताळणी झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्याला पुन्हा जातपडताळणीसाठी जावे लागणार नाही असा कायदा लवकरच आणत आहोत.
- १० वर्षापर्यंतच्या व्यावसायिक कर्जावरील व्याज शासन भरणार.
- मराठा समाजाच्या उन्नतीसाठी तसेच समस्या व उपाययोजनांसाठी बार्टीच्या धरतीवर ‘सारथी’ संशोधन संस्था स्थापन करणार
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सा.बां. (उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, खासदार संभाजीराजे भोसले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार नारायण राणे, विनायक मेटे, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, राम कदम, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे आदी विधानपरिषद व विधानसभेचे सदस, शिष्टमंडळातील नेते शशिकांत पवार यांच्यासह शिष्टमंडळातील अन्य कार्यकर्ते, निवेदन देण्यासाठी आलेल्या युवती, महिला उपस्थित होत्या.