जगभरातील साडेचारशेहून अधिक कंत्राटदारांचा उत्कर्ष महामार्गाच्या ‘वेबिनार’मध्ये सहभाग

मुंबई, दि. 5 : हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलच्या सुधारित तत्वानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘उत्कर्ष महामार्ग’ योजनेद्वारे राज्यातील दहा हजार किमी रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील साडेचारशेहून अधिक रस्ते बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी या कंत्राटदारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘उत्कर्ष महामार्ग’ अंतर्गत राज्यातील 10 हजार किमीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलच्या सुधारित तत्वांना मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 30 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पन्नास ते शंभर किमी रस्त्याचे एक प्रकल्प अशा सुमारे दीडशेहून अधिक प्रकल्पांची कामे होणार आहेत. या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या कंत्राटदारांनी सहभागी व्हावे व त्यांना या योजनेमध्ये कोणतीही शंका राहू नये, यासाठी आज मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये राज्यासह जगभरातील विविध देशातील कंत्राटदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबचॅट तसेच इमेलद्वारे सहभागी झाले होते. भारताबाहेरील दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लड आदी सात देश, भारतातील 18 राज्ये व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अशा सुमारे साडेचारशेहून अधिक कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता.
रस्त्यांचा दर्जा उत्तम रहावा, त्यांची देखभाल नियमित व्हावी, यासाठी हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलअंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यासाठी जगभरातील उत्तम व नामांकित कंत्राटदारांनी सहभागी व्हावे, यासाठी राज्यात प्रथमच वेबिनार ही संकल्पना राबविण्यात आली. पहिल्यांदाच राबविलेल्या या संकल्पनेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
या योजनेची व्याप्ती, वित्तीय सहकार्य, बँकेचे सहकार्य, प्रकल्प आराखडा, कामांचे वाटप, सुरक्षा अनामत, देयकांचा परताव्याची पद्धत अशा विविध बाबींसह तांत्रिक गोष्टींसंबंधीच्या शंकांना यावेळी मंत्री श्री. पाटील व श्री. आशिषकुमार सिंह यांनी उत्तरे दिली. यावेळी सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) ए.ए. सगणे आदी यावेळी उपस्थित होते.