ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 8 : पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवताना नागरिकांना विशेषतः महिलांना होणारा त्रास वाचावा आणि टँकरच्या पाण्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी राज्यातील दुष्काळी भागातील एक हजार गावांमध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बसविण्याचे निर्देश आज नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, कृषी व रोहयो सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, पाणी टंचाई असलेल्या 1688 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू आहेत. गावात टँकर आले की, पाणी भरण्यासाठी नागरिकांची घाई उडते. विशेषतः महिलांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दहा हजार लिटर क्षमतेच्या एक हजार टाक्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी कार्पोरेट कंपन्यांसमवेत बोलणे झाले असून काही कंपन्या यासाठी मदत करणार आहेत. दहा नळ जोडलेल्या या टाक्यांमध्ये टँकरचे पाणी भरून ठेवण्यात येईल. यामुळे पाणी घेण्यासाठी होणारी झुंबड व गडबड टळून सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल. राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळी भागासाठी निधी वितरित केला आहे. ही मदत शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही सुरू असून त्यावर रोजच्या रोज लक्ष ठेवले जात आहे.
दुष्काळी कालावधीत राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांसाठी 144.42 लाख मेट्रिक टन वाळलेल्या चाऱ्याची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेच्या वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत 9.62 लाख मेट्रिक टन हिरव्या वैरणीचे उत्पादन करण्यात येत आहे. तसेच 85 हजार 338 हेक्टर गाळपेर क्षेत्रात वैरण उत्पादनासाठी 19 हजार 878 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यांना आतापर्यंत 14 हजार 906 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या 18 हजार 450 हेक्टर गाळपेर जमिनीतून 14.33 लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आवश्यकतेनुसार मंडळस्तरावर एकापेक्षा जास्त चारा छावण्या सुरू होणार
उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी, अहमदनगर व औरंगाबाद या सहा जिल्ह्यात 8 गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 7 हजार 357 जनावरे दाखल झाली आहेत. आवश्यकता असेल त्या ठिकाणी अर्जांची छाननी करून तत्काळ चारा छावण्या सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडळस्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास व संस्था अथवा व्यक्तींनी चारा छावणी सुरू करण्याची तयारी दर्शविल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.