आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार पेन्शन मिळणार

Posted On Wednesday June 13th, 2018
1000 Rs Pension to the person imprisoned during the Emergency

आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रति महा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रति महा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणीबाणीच्या काळात लोकशाहीकरता लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार, व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे लागतील. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल.

संबंधित व्यक्तींनी अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची कारावासातील उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्याची यादी सामान्य प्रशासन विभागाला कळवण्यात येईल. या यादीनुसार, संबंधित व्यक्तींना पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.