छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना राबविणार

मुंबई, दि. 23 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान या नावाने तीन व्याज परतावा योजना व शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची तंत्रकौशल्य योजना येत्या 2 फेब्रुवारीपासून राबविण्यात येणार असून या सर्व योजना ‘महास्वयंम’ या संकेतस्थळावरून राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज येथे दिली.
सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भातील कार्यवाहीसाठी नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित झाली. यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. निलंगेकर, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक सुचिता भिकाणे आदी यावेळी उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मागास समाजातील तरुणांसाठी व्याज परताव्याच्या तीन योजना राबविण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के पर्यंतचा व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून देण्यात येणार आहे. कर्जाची मर्यादा १० लाखापर्यंत आहे. तर दुसरी योजनेत बचत गट, संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी यांना गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये गटांने घेतलेल्या कर्जाचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येणार आहे. तिसऱ्या योजना शेतकरी उत्पादक गटांसाठी असून गट प्रकल्प कर्ज योजनेतून बिनव्याजी दहा लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तंत्रकौशल्य योजना राबविण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक तंत्र शिक्षण देण्यात येणार आहे.
वरील चारही योजनांची सुरुवात येत्या २ फेब्रुवारीपासून होणार असून या सर्व योजना www.mahaswayam.in या संकेतस्थळामार्फत राबविण्यात येणार असल्याचे श्री. निलंगेकर पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजातील तरुणांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून त्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महामंडळास कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.