विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. चैनसुख संचेती तर ऊर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. योगेश जाधव

राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार श्री. चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त्यासाठी नावे जाहीर केली असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिल्याप्रमाणे या चार पदांच्या नियुक्त्या घोषित करण्यात येत असून त्यानुसार आवश्यक पुढील कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. चैनसुख संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. योगेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत असलेल्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्री दर्जा देण्याचेही मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केले आहे