जगातली सगळ्यात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव अर्थातच सार्वत्रिक निवडणूक नुकतीच आपल्या खंडप्राय देशात झाली. सुमारे अडीच महिने ही निवडणूक प्रक्रिया चालली होती. या निवडणुकीतही देशातल्या सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा माझ्या भारतीय जनता पार्टीलाच बहुमतानं निवडून दिल्याचं निकालांतून स्पष्ट झालंय. त्यामुळे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधानपद होताहेत. पक्षाचा निष्ठावान पाईक म्हणून या विजयाचा आनंद आहेच. पण विशेष आनंदाची बाब म्हणजे या निवडणुकीत पक्षानं माझ्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वी करण्याचं भाग्यही मला लाभलं. देशाचा कौल सलग दुसऱ्या पाच वर्षांसाठी मिळवला, त्या निवडणुकीत पक्षासाठी योगदान देता आलं, हा माझ्यासाठी आयुष्यभराचा आनंदाचा ठेवा आहे.
तर या लोकसभा निवडणुकांसाठी माझ्या पक्षानं अर्थात भाजपानं रणनीती आखली होती. लोकसभेसाठी ४८ जागा निवडून देणारं एक मोठं राज्य म्हणून स्वाभाविकच महाराष्ट्रासाठीही आम्ही व्यूहरचना केली होती. राज्याचं नेतृत्व कुशलपणे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे साहजिकच निवडणुकीचीही धुरा होती. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते उद्धवजी ठाकरे आणि आमच्या युतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या प्रत्येक नेत्यानंच नव्हे तर कार्यकर्त्यांनंही अत्यंत तडफेनं, प्रामाणिकपणानं आणि फक्त आणि फक्त विजयच मिळवायचा या जिद्दीनं काम करून हा विजय साकारला आहे. हा विजय त्या सगळ्यांचाही आहेच. त्यामुळे या कार्यकर्त्यांसह आमच्या युतीला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराचेही या निमित्तानं मी आभार मानतो. तुम्ही विश्वास दाखवलाय, आता तो आम्ही कामातून सार्थ ठरवू, हा माझा शब्द आहे.
असो. या निवडणुकीच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून प्रत्येक नेत्यावर काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार माझ्याकडे प्रामुख्यानं कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सांगली आणि बारामती हे ५ लोकसभा मतदारसंघ होते. आव्हान सोपं नव्हतंच, पण सोपं असेल तर ते आव्हान कसलं? आमच्या नियोजनानुसार या सर्व मतदारसंघांमध्ये कामाला सुरुवात केली. हे पाचही मतदारसंघ मी अक्षरशः पिंजून काढले. हे पाचही मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातले. महाराष्ट्राच्या या भागात काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून येण्याची परंपराच. कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक, हातकणंगल्यातून राजू शेट्टी (जे निवडून येताना आमच्यासोबत होते आणि निवडणुकीवेळी काँग्रेस आघाडीसोबत होते.) आणि बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे अशा प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान माझ्यासमोर होतं. सांगलीतली संजयकाका पाटील यांची जागा पुन्हा जिंकू असा विश्वास होता, पण गाफील राहून चालणार नव्हतं. माढ्यातून निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांचा २१ मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश झाला होता खरा, पण त्यामुळे प्रतिस्पर्धी अधिकच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. खुद्द शरद पवार यांनी थेट निवडणुकांतून पत्करलेली निवृत्ती बाजूला सारून ही जागा लढवण्याची घोषणा केली होती. अर्थात नंतर त्यांनी ही जागा लढवली नाही, हा पुढचा भाग झाला. तरीही आमचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यापुढे संजयमामा शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान होतं…
आज निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यातून कोल्हापुरातून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी (२,७०,५६८ मतांनी), हातकणंगल्यातूनही शिवसेनेच्याच धैर्यशील माने यांनी (९६,०३९ मतांनी), सांगलीतून भाजपाच्या संजय पाटील यांनी (१,६१,२६९ मतांनी) आणि काटे की टक्कर म्हणतात तशा प्रतिष्ठेच्या लढाईत माढ्यातून भाजपाच्याच रणजितसिंह निंबाळकर यांनी (८४,७५० मतांनी) विजयश्री मिळवल्याचं समोर आलंय. आपल्या परिश्रमाचं चीज झालं, असं वाटण्यासारखेच हे निकाल आहेत. ऐन उन्हाळ्यात, डोक्यावर प्रचंड उन तापलेलं असूनही आम्ही युतीच्या शिलेदारांनी खेचून आणलेले हे विजय आहेत. बारामतीत मात्र पवार कुटुंबानं पूर्ण ताकद लावल्यामुळे तो मतदारसंघ काही आम्हाला काबीज करता आला नाही. अन्यथा माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीत मी शत प्रतिशत यशस्वी झालो असतो आणि मग हा आनंद शतगुणित झाला असता.
मतदारांनी आम्हाला जो काही कौल दिलाय, तो मी शत प्रतिशत मान्य करतो. आणि असंही, मतदारांचा कौल किंवा ज्याला आपण जनादेश म्हणू, तो मान्य करणं, हाच तर लोकशाही व्यवस्थेतला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जनादेश स्वीकारून मी आमच्या या विजयी वीरांना विजयाबद्दल हार्दीक शुभेच्छा देतो. हे आमचे वीरच का, या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे, अशा प्रत्येक विजयी उमेदवाराचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. हे अभिनंदन करताना पक्ष, राज्य किंवा अन्य कुठलाही भेद करण्याचं काहीच कारण नाही. कारण निवडून आलेला प्रत्येक उमेदवार हा माझ्या देशाच्या, भारताच्या लोकसभेत जाणार आहे आणि माझा प्रिय भारत देश प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करणार आहे, असा मला विश्वास आहे.
म्हणूनच, आज निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर मी आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. प्रचार आणि एकूणच या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेकांशी संवाद वा अगदी विसंवादही झाला असेल. एखादा शब्द माझ्याकडूनही उणा-अधिक गेला असेल… पण आता तो विषय संपला आहे. कारण मी एका पक्षाच्या विचारधारेला मानून पुढे जाताना दुसऱ्या विचारधारेला मानणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊही शकतो, अधिक-उणा शब्द जाऊही शकतो. पण आता निवडणूक संपली आहे. कटुता आलीच असेल, तर ती दूर करायला हवी. त्या कटुतेचं वैरात रुपांतर होण्याची काहीच गरज नाही, अशी माझी प्रामुख्यानं भूमिका आहे. विरोधी पक्षातल्या कुणी बोलावलं, तर मी अगदी आनंदानं त्यांच्या घरी वा कार्यालयात पाहुणचार घ्यायला जाईन. विरोधी पक्षांतल्या कुणीही हक्कानं माझ्याकडे पाहुणचारासाठी यावं… माझं मन आणि दारही तुमच्यासाठी नेहमीच उघडं राहील.
आयुष्यात अनेकदा आपले अनेकांशी मतभेद होतातच… पण त्यांतून मनभेद होऊ नयेत, इतकंच.