अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई, दि. 3 : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज घेतला.
शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठीसंदर्भातील बैठक महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात झाली. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत 23 लाख 51 हजार कर्ज खात्यांवरील शेतकऱ्यांची कर्जे माफ केली असून, त्यापैकी 22लाख 13 हजार खात्यांवर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्ज माफ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करत होते. यावर आज झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, अशी माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत http://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ संकेतस्थळावरुन ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
भूविकास बँकांची कर्जमाफी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात माहिती संकलित करुन, धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.