मुठा कालवा फुटून नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना NDRF च्या नियमानुसार मदत मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई : पुण्यातील मुठा कालवा फूटून आपदग्रस्त झालेल्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार तात्काळ मदत देण्याचे निर्देश मा. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. मुठा कालवा आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासंदर्भात मा. मंत्रिमहोदयांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह मदत व पुनर्वसन आणि वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात पुणे शहरातून वाहणारा मुठा कालवा फुटून लाखोंचे नुकसान झाले होते. यात अनेक घरांची पडझड झाली होती. तर, अनेकांच्या घरातील सामान वाहून गेल्याने कुटुंबांना रस्त्यावर यावे लागले होते. त्यावर त्यांच्या मदतीसाठी शासनाच्या वतीने 3 कोटी रुपयाची मदत तात्काळ जाहीर केली होती. ही मदत एनडीआरएफच्या नियमानुसार आपदग्रस्तांना देण्याच्या सूचना मा. मंत्री महोदयांनी दिल्या. तसेच, मदतीची रक्कम तातडीने शनिवारपर्यंत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देखील मा. मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
दरम्यान, या घटनेतील आपदग्रस्तांपैकी झोपडपट्टीधारकांना याच भागात सुरु असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने सुरु असलेल्या इमारतींमध्ये पक्की घरे देऊन कायम स्वरुपाची निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.