बद्दल

बद्दल माहिती

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील

राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री




मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी १६ जुलै २०१९ रोजी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी – शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) – राष्ट्रीय समाज पक्ष – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना यांच्या महायुतीने निवडणुकीची तयारी केली. महायुतीतील प्रमुख पक्ष या नात्याने भाजपावर सर्वाधिक जबाबदारी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेला पक्षाचा संघटनात्मक विस्तार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची २०१४ ते २०१९ या कालावधीतील कामगिरी यामुळे भाजपाच्या नेतृत्वात महायुती विजयी होईल याची अपेक्षा होती. त्यानुसार निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला १६१ जागा मिळाल्या व मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले. राज्यात १९८५ नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला किंवा निवडणूकपूर्व युतीला पूर्ण बहुमत मिळाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीत पक्ष संघटनेची जबाबदारी पार पाडली.


वैयक्तिक माहिती

संपूर्ण नाव:
मा. श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील
जन् :
१० जून १९५९; प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई
आई-वडील :
दोघेही मिल कामगार
शिक्षण :
शालेय शिक्षण - राजा शिवाजी विद्यालय, दादर, मुंबई
महाविद्यालयीन शिक्षण :
बी.कॉम, सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट मुंबई
पत्नी :
सौ. अंजली चंद्रकांत पाटील B.com, ICWA, (cost accountant)

संघटनात्मक कार्य

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) तत्वचिंतक स्वर्गीय यशवंतरावजी केळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या कामास सुरुवात केली. ऑगस्ट १९८० रोजी जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषणा झाली. यानंतर जळगाव जिल्ह्यात अभाविपचं काम वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. १९८० ते १९८३ या कालखंडात जळगाव जिल्ह्यात अभाविपची उत्तम संघटन बांधणी केल्यानंतर, त्यांच्यावर अभाविपची महाराष्ट्र संघटन महामंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ही जबाबदारी मिळाल्यानंतर १९८८-८९ हे वर्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी संघर्षपर्व जाहीर केले होते. राज्यस्तरापासून शाखा स्तरापर्यंत केवळ महाविद्यालयातील निवडणुकांच नव्हे, तर कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक सक्रिय केले. त्यामुळे अभाविपचे झेंडे विद्यार्थी संसदेवर फडकू लागले. मुंबई विद्यापीठाची देशभर गाजलेली निवडणूक त्यांच्यामुळे अविस्मरणीय ठरली. या संघर्ष पर्वातच मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘कॅम्पस कल्चर’ हा नवा आयाम अभाविपला दिला. याशिवाय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासोबतच त्यांनी अन्य कार्यक्रमांद्वारे उपक्रमशीलतेवर खूप भर दिला. तंत्रशिक्षण, अभाविप डिपेक्स, कृषिशिक्षण विद्यार्थी परिषद यांसारखे नवनवीन आयाम त्यांच्यामुळेच विकसित होऊ लागले. प्रत्येक आयामासाठी समर्थ कार्यकर्ते त्यांनी उभे केले. सन १९९०-९४ या कालावधीत त्यांच्यावर राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी सांभाळताना मा. दादांनी पूर्वोत्तर राज्यातील ‘आंतर छात्र जीवन दर्शन’ या प्रकल्पाला आगळेवेगळे स्थान प्राप्त करून दिले. सन १९९० मध्ये अभाविपच्या वतीने काश्मीर प्रश्नावर देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी ‘चलो काश्मीर’ नावाने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गतच सुमारे २० हजार तरुण श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाण्याची योजना होती. या मोहिमेचे नेतृत्व मा. चंद्रकांतदादा करत होते. या मोहिमेअंतर्गत तरुणांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी ठिकठिकाणी मान्यवरांची भाषणे होत होती. या माध्यमातून हे मान्यवर काश्मीरमधील भीषण परिस्थितीचे वास्तव तरुणांसमोर मांडत होते. या सर्व तरुणांनी श्रीनगरकडे कूच केल्यानंतर या सर्वांना उधमपूर येथे अटक झाली. यानंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांनी आपला मोर्चा राजधानी दिल्लीकडे वळवला. राजधानी दिल्लीत आंदोलन सुरु केल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान मा. व्ही. पी. सिंह यांनी या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मा. दादा पंतप्रधान मा. श्री. व्ही. पी. सिंह यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत सखोल चर्चेनंतर मा. श्री. दादांनी आपल्याकडील तिरंगा ध्वज पंतप्रधान मा. श्री. व्ही. पी. सिंह यांना देऊन; हा तिरंगा श्रीनगरमधील लाल चौकात फडकवण्याची विनंती केली.

अभाविपमध्ये प्रचारक म्हणून काम थांबवल्यानंतर मा. चंद्रकातंदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. सन १९९५-१९९९ या कालावधीत त्यांच्याकडे रा. स्व. संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. यानंतर सन १९९९-२००४ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात त्यांची मोलाची भूमिका होती. सतत १३ वर्षे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करणारे मा. दादा हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेचे जानेवारी १९९४ ते एप्रिल २००० पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते. तर एप्रिल २००० ते मार्च २०१३ पर्यंत दादांकडे सचिवपदाची जबाबदारी होती.

प्रवास

राजकीय प्रवास

सन २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या आग्रहास्तव मा. दादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सन २००४ – २००७ या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात दादांनी आपल्या कार्य कर्तृत्वाची झलक उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. यानंतर सन २००७-२०१० या काळात भाजप प्रदेश सरचिटणीस, तर सन २०१०-२०१५ पर्यंत त्यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जुलै २०१९ पासून त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.

सन २००८ मध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदार संघातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूक लढविण्याची संधी मा. दादांना दिली. या निवडणुकीत विजयी होऊन विधान परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडले. विधान परिषदेमधील त्यांच्या प्रभावी कारकीर्दीमुळे सन २०१४ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा संधी दिली. या निवडणुकीत दादांचा दणदणीत विजय होऊन, त्यांनी विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार स्थापन झाले त्यावेळी या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्री होण्याचा बहुमान मिळाला.

मंत्रिमंडळात समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार मा. दादांकडे सोपवण्यात आला. सार्वजानिक बांधकाम विभाग वगळून इतर दोन विभागांची जबाबदारी मा. श्री. दादांनी ऑक्टोबर २०१६ पर्यंत समर्थपणे सांभाळली. यानंतर त्यांच्याकडे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जुलै २०१६ मध्ये त्यांची विधानपरिषदेचा सभागृह नेता म्हणून निवड झाली. कै. पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर जून २०१८ त्यांच्याकडे कृषी व फलोत्पादन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. या सर्व खात्यांचा कार्यभार त्यांनी यशस्वपणे सांभाळला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली.

कामगिरी

मंत्रि‍पदावरील कामगिरी

महसूल : महसूल खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मा. दादांनी शेतकऱ्यांच्या शेताचा सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यासाठी तलाठी ऑफिसमधील हेलपाटे कमी केले. याशिवाय विदर्भातील १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना भूमीस्वामीचा हक्क मिळवून देऊन इथल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. यासोबतच २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी नागरी स्वराज्य संस्थांना शासकीय तसेच गायरान जमीन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. सत्तर वर्षांपासून प्रलंबित सिंधी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावून सिंधी बांधवांना मोठा दिलासा मिळवून दिला. यासोबतच पानशेत पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावून पुण्यातील हजारो कुटुंबांचा निवारा सुरक्षित केला.

मदत पुनर्वसन विभागातील धोरणात्मक निर्णय
जुलै २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील माळीण गावात भूस्खलन होऊन संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. या दुर्घटनेत १५१ जणांना जीव गमवावा लागला होता. या भयंकर दुर्घटनेनंतर अल्पावधीतच सन २०१७ पर्यंत गावाचे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसन गावातील बांधकामे भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञान वापरुन पूर्ण करण्यात आली. या कामी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल आणि मदत व पुनर्वसन विभागाला जलदगतीने कामास लावून इथल्या नागरिकांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचे काम केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग : राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर १०० किमी रस्त्यांच्या उभारणीत प्लास्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यातील रस्ते खड्डेमुक्तीसाठी दर १० किमी रस्त्यांसाठी द्विवार्षिक रस्ते दुरुस्ती व देखभाल योजना राबवली. या शिवाय प्रमुख राज्य मार्गांच्या IRC (Indian Road Congress) मानांकनाप्रमाणे दर्जोन्नतीसाठी हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल (HAM) योजनेची अंमलबजावणी केली. या योजनेअंतर्गंत ६० टक्के रक्कम अदा करुन राज्यातील रस्ते सुधारण्यात येत आहेत; तर उर्वरित ४० टक्के संबंधित कंत्राटदाराला पुढील १० वर्षाच्या कालावधीत देण्यात येणार आहेत. याशिवाय संबंधित कंत्राटदारावर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची १० वर्षांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सुमारे १५ हजार किमी लांबीच्या रस्त्यांची राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जोन्नतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली. त्यासोबतच सहा हजार किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुंबई-गोवा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग, पोलादपूर -महाबळेश्वर महामार्गाच्या कामाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. महाडजवळील सावित्री पूल दुर्घटनेनंतर हा पूल विक्रमी वेळेत पूर्ण करुन वाहतुकीसाठी खुला करण्याचे महत्त्वाचे काम केले. त्याशिवाय, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन, पुलांवर अत्याधुनिक सेन्सर बसवले. या सेन्सरमुळे महापूराच्यावेळी त्याची पूर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत तात्काळ पोहोचेल, व सदर पूलवरील वाहतूक थांबवता येईल. ३१ मे २०१५ रोजी ‘टोलमुक्त महाराष्ट्रा’चा निर्णय घेऊन सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १२ टोल पूर्णपणे बंद केले. तर मुंबई वगळता उर्वरित टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना टोलमुक्ती दिली. महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्य मार्ग व प्रमुख मार्गांवरील महिला प्रवाशांसाठी ५० किमीवर एक अशा प्रमाणात १२६ ठिकाणी जनसुविधा केंद्रे उपलब्ध करुन दिली.
भाजपाचे सरकार असताना २०१४ ते २०१९ या कालावधीत भूषविलेली इतर महत्त्वाची पदे

प्रवास

सामाजिक कार्य

अतिशय सामान्य कुटुंबातून आल्यामुळे मा. चंद्रकांत दादांना सर्वसामान्यांची दु:खं, त्यांचे प्रश्न अतिशय जवळून माहिती आहेत. यामुळेच जे प्रश्न शासकीय स्तरावर सोडवणे शक्य नाही, ते विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सोडवण्यास मा. दादांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.

संवेदना फाऊंडेशन : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी २०१८ साली कोल्हापूरमध्ये दादांच्या प्रेरणेतून संवेदना फाऊंडेशनची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात पाच रुपयात पोळी-भाजी केंद्रचा उपक्रम राबवला जात आहे.

आर्थिकदृष्ट्या वंचितांचे ‘खेळघर’ : आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे, या दोन प्रमुख उद्देशातून मा. दादांच्या संकल्पनेतून खेळघर उपक्रमाची सुरुवात झाली. सध्या शहरातील २३ ठिकाणी हा उपक्रम कार्यन्वित असून, प्रत्येक खेळघरात २० ते २५ असे आर्थिकदृष्टया वंचित कुटुंबातील एकूण सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


आदर्श ग्राम दत्तक योजना :
गावं समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल हे जाणून महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात ‘आदर्श ग्राम योजना’ राबवली. याच धर्तीवर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनीही कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श ग्रामदत्तक योजनेतून मौजे दारवाड आणि खानापूर (ता. भुदरगड) ही दोन गावे दत्तक घेऊन शाश्वत शेतीचा प्रयोग राबवून गावाचा कायापालट केला.


आदर्श ग्राम दत्तक योजना :
गावं समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल हे जाणून महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात ‘आदर्श ग्राम योजना’ राबवली. याच धर्तीवर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनीही कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श ग्रामदत्तक योजनेतून मौजे दारवाड आणि खानापूर (ता. भुदरगड) ही दोन गावे दत्तक घेऊन शाश्वत शेतीचा प्रयोग राबवून गावाचा कायापालट केला.

सावली केअर सेंटर : विविध आजारांनी ग्रासलेल्या आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी मेरिड-इंडिया (Medical Relief and Education Public Charitable Trust-INDIA) च्या अंतर्गत ‘सावली केअर सेंटर’ हा प्रकल्प सुरु झाला. सावली मध्ये रुग्णांची २४ तास संपूर्ण नर्सिंग केअर, डॉक्टरांकडून तपासणी, त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, फिजिओथेरपीचे व्यायाम तसेच अत्यावश्यक सेवांतर्गत ऑक्सिजन सिलेंडर, नेब्युलायझर, सक्शन मशीन, अॅम्ब्युलंस (रुग्णवाहिका), एक्स-रे अशा सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प : कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालावी या उद्देशाने ‘कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्प’ (केएसबीपीने) सुरु करण्यात आला. या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण घेतलेल्या तरूणांच्या टीमने कोल्हापूरचे स्मार्ट सिटीत रुपांतर केले आहे. तसेच शहरातील उजाड चौकांमध्ये आकर्षक वृक्षारोपण करुन शहराचे रुपडे पालटले आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजमितीस महाराणी ताराराणी चौक, बिंदू चौक, पोलीस मुख्यालय चौक, शिवाजी विद्यापीठ, पोस्ट ऑफिस चौक या ठिकाणांचे सौंदर्यीकरण करुन शहराला स्मार्ट बनवलं आहे.

बीजमाता राहिबाई पोपेरेंना मदतीचा हात : शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या धान्याची वाणं आज खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा पारंपारिक आणि देशी वाणाचं जतन करणाऱ्याचं काम अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या आदिवासी खेडे गावातील महिला शेतकरी राहिबाई पोपेरे करीत आहेत. या बीजमातेला देशी वाणांचे मोठ्या प्रमाणात जतन करण्याची मनोमन इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते. अशातच पुण्यात एका पुरस्कार प्रदान कार्यक्रमात राहिबाईंनी आपल्या मनीची व्यथा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर मांडली. मा. दादा यांनीदेखील तात्काळ त्यांची व्यथा समजून घेऊन त्यांना बियाण्यांची बँक उभी करुन देण्याविषयी आश्वस्त केले. हे आश्वासन केवळ शब्दातच नव्हे, तर प्रत्यक्षात देखील उतरवले. सुमारे २५०० चौरस फुटांचे अत्याधुनिक पण त्याला अधुनिकतेची जोड देणारी बीज बँक उभारुन दिली. सध्या या बीजबँकेत ५४ पिकांचे ११४ गावरान वाण शास्त्रशुध्द पद्धतीने जतन केले जात आहे.

जळगावमधील दिव्यांगांना मदतीचा हात : जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग तथा शारिरीकदृष्टया दुर्बलांसाठी चाळीसगावमध्ये स्वयंदीप फाऊंडेशन आणि जळगावमधील दीपस्तंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांगासाठी व्हीलचेअर उपलब्ध करुन दिल्या. तर जळगाव शहरातील दीपस्तंभ फाऊंडेशनला दिव्यांगांच्या सुश्रूशेसाठी इमारत उभारणीमध्ये सर्वतोपरी सहकार्य केले.

जळगावमध्ये पर्यावरण शाळेची उभारणी : पर्यावरणाचे महत्त्व पुढच्या पीढिला कळावे यासाठी मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून जळगावमध्ये पर्यावरण शाळेची उभारणी करण्यात आली आहे.

आदिवासी पाडे केले प्रकाशमान : देश स्वतंत्र होऊन ७० वर्षाचा काळ उलटूनही जळगाव जिल्ह्यातील रुईखेडा आणि आंबापाणी या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नजरेत ही बाब आल्यानंतर, त्यांनी जळगावचे पालकमंत्रीपद असताना आपल्या पालकमंत्री निधीतून या आदिवासी पाड्यातील नागरिकांचे जीवनमानच बदलून टाकले. जवळपास ७० लाख रुपये खर्चून या आदिवासी पाड्यावरील प्रत्येक घरात सोलर दिवे बसवून दिले.