जीवन परिचय

चंद्रकांत (दादा) पाटील

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा जन्म १० जून १९५९ रोजी सौ. सरस्वती पाटील आणि श्री. बच्चू पाटील यांचे अपत्य म्हणून मराठा कुटुंबात झाला. चंद्रकांतदादांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गारगोटी. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईच्या रे रोड येथील प्रभूदास चाळीत गेले. चंद्रकांतदादांचे कुटुंब अल्पभूधारक असल्याने त्यांचे वडील श्री बच्चू पाटील अतिशय कमी वयातच उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थाईक झाले. ते, मुंबईतील कापड गिरणीमध्ये ‘किटली बॉय’ म्हणून काम करत, तर आईदेखील त्याच मिलमध्ये काम करत होत्या. त्यामुळे चंद्रकांतदादांचे बालपण अतिशय कष्टप्रद आणि हलाखीचे होते.
अतिशय साधे राहणीमान, कणखर पण संयमी व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर सतत स्मितहास्य, समाजकार्याची प्रचंड तळमळ आणि टोकाची आत्मीयता, रंजल्या-गांजलेल्यांना न्याय मिळवून देणे, मुलींच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करणे, मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देऊन बळ देणे आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येकाची काळजी घेणे ही चंद्रकांतदादांची स्वभाववैशिष्ट्ये. चंद्रकांतदादांनी २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०१९ पुणे पदवीधर मतदारसंघाचे दोन वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. २०१९ पासून विधानसभेच्या कोथरूड या मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व ते करत आहेत.
चंद्रकांतदादांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालय मध्ये झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण मुंबईतील फोर्ट येथे असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात झाले.
चंद्रकांतदादांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.कॉम.ची पदवी (१९८०) संपादन केली. लहानपणापासूनच त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच राष्ट्रीय आणि हिंदुत्ववादी विचारांनी भारावून जात अभाविपचे पूर्व कार्यकर्ते शरद चव्हाण यांच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) ते संपर्कात आले. अभाविपच्या संपर्कात आल्यानंतर विद्यार्थी परिषदेचे प्रमुख आधारस्तंभ स्वर्गीय प्रा. यशवंतराव केळकर, स्वर्गीय ॲड. बाळासाहेब आपटे, स्वर्गीय मदनदासजी देवी यांच्या सहवासात त्यांची जडणघडण आणि वैचारिक बैठक पक्की झाली.
सन १९७८ मध्ये जालन्याच्या प्रदेश अभ्यासवर्गात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तत्वचिंतक प्रा. यशवंतराव केळकर यांनी कार्यकर्त्यांना संघटनेसाठी पूर्ण वेळ देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार, चंद्रकांतदादांनी १३ वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण भारतभर कार्य केले. आधी महाराष्ट्र, मग गुजरात, गोवा त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी भारतभर अनेक कार्यकर्ते घडवले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता, रा. स्व. संघाचे विभाग सहकार्यवाह (पश्चिम महाराष्ट्र), भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव, उपाध्यक्ष, महामंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. संघटन कौशल्याच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते संघटनेशी जोडून संघटनेचा विस्तार केला. याच कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपाच्या कामाचे जाळे गावपातळीपर्यंत विस्तारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. स्वतंत्र भारतामध्ये झालेल्या प्रमुख आंदोलनांपैकी प्रमुख अशा श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन,बांग्लादेशी घुसखोरांविरोधी आंदोलन, कलम ३७० हटविण्यासाठी ‘चलो काश्मीर’, आसाम बचाव आंदोलन अशा विविध आंदोलनांत त्यांचा प्रमुख सहभाग होता. याशिवाय शासनाच्या विद्यार्थी विरोधी आणि शिक्षणहित विरोधी अनेक आंदोलनांचेही त्यांनी नेतृत्व केले.

२०१४ ते २०१९ काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजानिक बांधकाम (सार्वजानिक उपक्रम वगळून), महसूल, मदत आणि पुनर्वसन, कृषि, अशा विविध विभागांचे मंत्री म्हणून जबाबदारी अतिशय चोख व सक्षमरित्या त्यांनी सांभाळली. त्यासोबतच सांगली, कोल्हापूर, जळगाव, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले. 

सप्टेंबर २०२२ पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रद्योग, संसदीय कार्यमंत्री आदी जबाबदाऱ्या आहेत. तसेच, सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पुणे जिल्हा आणि ऑक्टोबर २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उत्तम संघटन कौशल्य, प्रचंड मेहनत, संयमी आणि संवेदनशील स्वभाव आदीच्या जोरावर त्यांनी राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या जीवन आणि राजकीय वाटचालीचा प्रवास प्रत्येकासाठी, विशेषतः तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.