राजकीय नेतृत्व

रा. स्व. संघ आणि संघ परिवारातील सर्व संस्थांमध्ये सर्व निर्णय सामूहिक चिंतन आणि चर्चेतून घेतले जातात. त्यामुळे या प्रक्रियेचे नेतृत्व जबाबदार व्यक्तीकडे असते. अभाविपचे तत्वचिंतक स्वर्गीय प्रा. यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे आणि पुढे मदनदासजी देवी यांनी हे संस्कार विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करणाऱ्या चंद्रकांतदादांवर केले होते. त्यामुळे त्यांची हीच शिकवण राजकीय जीवनातही काम करताना चंद्रकांतदादांनी पक्ष संघटनेतही रुजवली.
सन २००४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या आग्रहास्तव चंद्रकांतदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सन २००४ – २००७ या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात चंद्रकांतदादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक उभ्या महाराष्ट्राला दाखवली. यानंतर सन २००७-२०१० या काळात भाजप प्रदेश सरचिटणीस, तर सन २०१०-२०१५ पर्यंत त्यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जुलै २०१९ ते सप्टेंबर २०२२ त्यांच्याकडे भाजपा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
कोणत्याही संघटनेचा विकास होण्यासाठी तिला नित्य विकसित होणारी सैद्धांतिक भूमिका आवश्यक असते. त्यासाठी ती अभिव्यक्त होण्यासाठी लागणारी कार्यपद्धती आणि कार्यकर्ता विकासाची प्रकिया विकसित व्हावी लागते. ही सैद्धांतिक भूमिका विद्यार्थी परिषदेने राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात विकसित केली. या सैद्धांतिक बैठकीतूनच तयार झालेल्या चंद्रकांतदादांनी विद्यार्थी परिषदेचे संस्कार भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रुजवले; अन् पक्षाचा ग्रामीण भागांतही विस्तार केला, भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली.
सन २००८ मध्ये भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढवण्याची संधी चंद्रकांतदादांना दिली. या निवडणुकीत विजयी होऊन ते विधान परिषद सदस्य झाले. या संधीचा लाभ घेत त्यांनी अत्यंत अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडले. विधान परिषदेमधील त्यांच्या प्रभावी कारकीर्दीमुळे सन २०१४ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा संधी दिली. या निवडणुकीत चंद्रकांतदादांचा दणदणीत विजय होऊन, त्यांनी विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला.
सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार स्थापन झाले. तेव्हा या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री होण्याचा बहुमान मिळाला. जुलै २०१९मध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. संघटन कौशल्याद्वारे भारतीय जनता पार्टीला २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.
महाराष्ट्रात एक काळ असा होता की, राजकारणात केवळ घराणेशाहीलाच स्थान मिळत होते. मात्र, या समीकरणाला छेद देत चंद्रकांतदादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. आपल्या उत्तम संघटन कौशल्य आणि संघटनेसाठी सर्वस्व पणाला लावून काम करण्याच्या वृत्तीमुळे पक्षाला ग्रामीण भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी रुजवले. संघटना कुणा एका व्यक्तीच्या घरातून चालू नये, तर पक्षाच्या कार्यालयातूनच चालायला हवी, अशी त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे स्वत:चे उत्तम सोईसुविधांनी युक्त कार्यालय सुरू झाले आहे.