ध्यास विकासाचा, व समाजसेवेचा!
आज माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करून कोथरूड आणि बाणेर मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी आपले शासकीय व सार्वजनिक प्रश्न मांडले. दरम्यान सर्व नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. जनता दरबारामुळे नागरिकांशी थेट संपर्क होऊन त्यांची कामे मार्गी लागतात तेव्हा अत्यानंद होतो. तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा भाव मनाला समाधान देऊन जातो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून जगण्यासाठी केवळ पैसा नाही तर माणुसकी आणि समाधान तितकंच महत्वाचं आहे याची प्रचिती येते.
कोथरूडकरांच्या समस्या सोडविण्यासाठी माझं जनसंपर्क कार्यालय नेहमीच कार्यतत्पर असते. शैक्षणिक तथा इतर कामांसाठी अत्यावश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले कोथरूडकरांना सहज उपलब्ध व्हावेत यासाठी मोफत महा ई-सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या महा ई-सेवा केंद्राचा कोथरुडकरांना मोठा लाभ होत आहे. दरम्यान यापैकी काही नागरिकांचे विविध प्रकारचे दाखले तयार झाले असून, त्या लाभार्थ्यांना त्यांचे दाखले वितरित केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून काम करण्यास अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
आजच्या व्यस्त दिनचर्येमुळे कुटुंबाला एकत्रित वेळ घालवता यावा या उद्देशाने माझ्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमध्ये नमो करंडकाच्या माध्यमातून भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंबासाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. या फॅमिली वॉकेथॉन मध्ये बाणेरमधील अनेक कुटुंबांचा सहभाग लाभला होता. यात आगदी अबाल वृद्ध ते माता – भगिनींपासून सर्वच सहभागी झाले होते, त्यामुळे ही स्पर्धा एखाद्या सोहळ्याप्रमाणे पार पडली. यावेळी टिपलेले काही अविस्मरणीय क्षण !
जय श्रीराम!
तब्बल ५०० वर्ष रामभक्तांच्या साधनेमुळे २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांचे आगमन झाले. यानुषंगाने माझ्यासह प्रत्येकालाच प्रभू रामल्लांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. म्हणूनच, आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यातील रामभक्तांसाठी भारतीय जनता पक्षाने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यानुसार, पुण्यातून आस्था ट्रेनने अयोध्येकडे प्रयाण केले. याप्रसंगी पुणे रेल्वे स्थानक येथे उपस्थित राहून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. वास्तविक आपल्याकडे ज्याप्रमाणे आषाढी-कार्तिकीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली असते तशीच ओढ पुण्यातून अयोध्येकडे जाणाऱ्या रामभक्तांमध्ये होती. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आपण भक्तीभावाने नमस्कार करतो तशीच भावना अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक रामभक्तांप्रती होती. त्यामुळे आज सर्व रामभक्तांना नमस्कार करुन आमचा ही नमस्कार प्रभू श्रीरामांच्या चरणी पोहोचवावा. तसेच, रामल्लांच्या दर्शनाचा योग माझ्या सारख्या अन्य ही रामभक्तांना लवकरच घडावा, अशी प्रार्थना याप्रसंगी केली.
गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आज पुणे जिल्ह्यातील नाणेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेस सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांचे शब्द भंडार वृद्धिंगत व्हावे या हेतूने शाळेस गोष्टींची पुस्तके भेट दिली. तसेच यावेळी उत्सुकतेने विद्यार्थ्यांच्या बाजूला बसून त्यांचे वाचन घेतले व भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्व अधोरेखित करून त्यांना मार्गदर्शन केले.
जळगावचं आणि माझं वेगळं नातं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कामासाठी कार्यकर्ता म्हणून घर सोडले, तेव्हा सर्वात पहिल्यांदा मला जळगाव हे कार्यक्षेत्र मिळाले मिळाले होते. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या काळातील अनेक जुन्या आठवणींशी मी आजही जोडलेलो आहे. अभाविपचं काम करत असताना शिवाजीनगर मधील ज्या वाड्यात रहायचो, त्या वाड्याचा केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात आला आहे. या ठिकाणी कै. हरिभाऊ तथा अन्नपूर्णा भिरुड बालभवन उभारण्यात आले आहे. वास्तविक, रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी समतोल प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव मध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता या उपक्रमातील मुलांना या वास्तूचा आधार मिळाला आहे. या उपक्रमास समाजातील इतरही नागरिकांनी मदत केली पाहिजे, अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष दिलीप चोपडा, समतोल प्रकल्पाचे प्रमुख राहुल पवार, डॉ. सुरेंद्र भिरुड यांच्यासह संघ परिवारातील इतर मान्यवर आणि विद्यार्थी परिषदेच्या काळातील अनेक जुने सहकारी उपस्थित होते.
जळगांव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे मुलींच्या वसतिगृहात विविध उपकरणांनी सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. यासह धकाधकीच्या जीवनात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या फिटनेस व आरोग्याकडे लक्ष देता यावे यासाठी खुल्या मैदानात व्यायामशाळा (Green Gym) सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही व्यायाम शाळांचे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री भरतदादा अमळकर व शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या संस्थेचे माजी विद्यार्थी व उद्योजक श्री. सुनील बढे उपस्थित होते.
संकल्प मोतिबिंदूमुक्त कोथरुडचा…!
डोळे हा आपल्या शरिरातील सर्वात नाजूक, संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे उतारवयात याला मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. या आजारापासून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, याचा मोठा खर्च असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठांना हा खर्च करणे अवघड ठरते. या अनुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोथरुड मधील आर्थिक दुर्बल कुटुंबावरचा हा ताण कमी करण्यासाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा कोथरुडकर मोठा संख्येने लाभ घेत असल्याचे पाहून आनंद वाटतो.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापराक्रमामुळे महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. हे गड किल्ले आपल्या अस्मितेची ओळख आहेत. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती व्हावी, या हेतूने दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ल्याची सहल घडविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार, आज लोहगडसाठी कोथरुड मधील बाल मित्र रवाना झाले. यावेळी उपस्थित राहून या बाल मित्रांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या पुढाकारामुळे भावी पिढीमध्ये गड किल्ले यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल असा विश्वास वाटतो.
“नमो चषक २०२४” अंतर्गत दि १४ आणि १५ फेब्रुवारी अशी दोन दिवसीय “भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा” आयोजित केली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नवोदित खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेस पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दक्षिण मंडलाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका प्रीतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, उपाध्यक्ष भा.ज.पा. गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, आकाश दादा बालवडकर, मयुरेश बालवडकर, सचिन दळवी, प्रमोद कांबळे, सरचिटणीस कोथरूड दक्षिण मंडल दीपक पवार, गिरीश खत्री आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर मंडल युवा मोर्चाचे सरचिटणीस निलेश सायकर, कोथरूड युवा मोर्चाचे सरचिटणीस सोहम मुरकुटे, कोथरूड युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कौशल टंकसाळी व अवधूत गायकवाड यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
जय शिवाजी, जय भवानी !
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने शिवजयंतीचे औचित्य साधत लहान मुलांना शिवरायांच्या युद्धनीतीची ओळख व्हावी यासाठी भाजपा कोथरुड मंडल ‘नमो चषक’च्या माध्यमातून कोथरुड मतदारसंघात लाठी-काठी आणि मर्दानी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी खेळाडुंनी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. ही सर्व प्रात्यक्षिके पाहून बालमित्रांचा अभिमान वाटला. एवढ्या लहान वयात देखील त्यांच्या अंगातील हे कसब कौतुकास्पद आहे.
बालवय हे संस्कारक्षम असते. या बाल वयातच विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे ग्रंथ वाचण्यास मिळाले, तर त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. त्यामुळे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू करताना मला प्रचंड आनंद होत आहे. प्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते कोथरुडमधील अभिनव स्कूल येथे या फिरत्या बाल बाचनालयाचे लोकार्पण केले. टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेम अशा विविध अत्याधुनिक साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी कमी होत असल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे, अवांतर विषयांच्या पुस्तक वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी विद्यार्थ्यांना हा उपक्रम नक्कीच लाभदायक ठरेल, असा मला विश्वास वाटतो. बाल वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी मित्र, शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नवीन पिढीला पुस्तकांमधील साहित्याच्या सानिध्यात आणण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू केले. या वाचनालयाचे लोकार्पण करताना लाभलेला आनंद अवर्णनीय आहे. या पुढाकारमुळे नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजून त्याचे दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास वाटतो. पाहूया बाल वाचनालय लोकार्पण सोहळ्या दरम्यान टिपलेले काही क्षणचित्रे!
स्वामी विवेकानंद म्हणतात, “जीवनात आनंद शोधताना खरा आनंद कष्टाचा असतो.” आपली समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा याचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारे हे हात आपल्या समाजाचे विश्वकर्मा आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात हे विश्वकर्मा अनेकदा सकाळी उठल्यावर वेळेअभावी घोटभर पाणी पिऊन उपाशीपोटी कामाला सुरुवात करतात. मी स्वतः एका गिरणी कामगाराचा मुलगा असल्याने; माझ्या आई-वडिलांनी आमचे पालनपोषण करताना कशाप्रकारे पोटाला तोशीश सहन केली, हे लहानपणापासून अनुभवले आहे. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी यासाठी कोथरुडमध्ये ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम सुरू करताना प्रचंड आनंद होत आहे. वास्तविक, दुसऱ्याचे दुःख आपल्या हृदयात सामील करून त्याच्यावर उपाय शोधत राहिलो; तर आपल्या आनंदाला एक वेगळाच साज चढतो, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली याचे मनाला वेगळेच समाधान देणारे आहे.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मध्ये सांगितले आहे की, ‘जो जे वांछिल तो ते लाहो…’ म्हणजे सर्वांच्या मंगलइच्छा पूर्ण होवोत. कोथरुड मधील प्रत्येक नागरिकांना इच्छित सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतो. यातीलच एक उपक्रम म्हणजे कोथरूडकरांना रेशन कार्ड मिळवून देणे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासनाच्या वतीने धान्य मिळत असते. मात्र, अनेकांचे रेशनकार्ड बंद असल्याने किंवा काही त्रुटींमुळे रेशनच्या दुकानातून धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी गेल्या वर्षभरापासून मोफत रेशनकार्ड दुरुस्ती केंद्र सुरू केले आहे. याचा अनेकांना लाभ होत आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने; कोथरुडकरांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी रेशनकार्ड सुरू होईपर्यंत लोकसहभागातून धान्य उपलब्ध करून दिले आहे.
राज्यातील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, राज्यासह देशाला उदयोन्मुख प्रतिभाशाली खेळाडू मिळावेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत माझ्या कोथरुड मतदारसंघातील पटवर्धन बाग येथे आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा स्थळी भेट देऊन खेळाडुंना प्रोत्साहन दिले.
तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘नमो चषक २०२४’ अंतर्गत कोथरुड श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भेट देऊन खेळाडुंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार अतिशय उपयुक्त असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
पुस्तकं ही मानवाची परम मित्र आहेत. पुस्तके प्रसंगी मार्गदाते बनून आयुष्यात सुखी होण्याचे मार्गदर्शन करतात. तरूणाईमध्ये वाचनाची गोडी वाढावी, यासाठी कोथरूडमध्ये फिरते वाचनालय सूरू केले आहे. यात मराठी पुस्तकांचा खजिना असंख्य वाचनप्रेमींना भुरळ घालतो आहे. या उपक्रमाचा लाभ कोथरूडकर घेत असल्याचे पाहून आनंद वाटतो. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त पाहुया या उपक्रमाबद्दल कोथरूडकरांच्या प्रतिक्रिया!