सन १९८० ते १९८३ या तीन वर्षांत जळगाव जिल्ह्यात त्यांनी अभाविपचा उत्तम संघटनात्मक विस्तार केला. त्यानंतर ते अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री झाले. १९८८-८९ हे वर्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संघर्षपर्व जाहीर केले. राज्यस्तरापासून शाखा स्तरापर्यंत केवळ महाविद्यालयातील निवडणुकांच नव्हे, तर कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्रिय केले. त्यामुळे अभाविपच्या अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठांचे नेतृत्व/ प्रतिनिधित्व केले. देशभर गाजलेली मुंबई विद्यापीठाची निवडणूक दादांच्या कुशल रणनीतीमुळे अविस्मरणीय ठरली, आणि प्रथम मुंबई विद्यापीठावर अभाविप चे प्राबल्य निर्माण झाले.
या संघर्षपर्वातच (चंद्रकांतदादा पाटील) त्यांनी ‘कॅम्पस कल्चर’ हा नवा आयाम अभाविपला दिला. याशिवाय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासोबतच त्यांनी अन्य रचनात्मक कार्यक्रमांद्वारे उपक्रमशीलतेवर खूप भर दिला. डिप्लोमा एक्झिबिशन (DIPEX), तंत्रशिक्षण विद्यार्थी परिषद (TSVP), कृषिशिक्षण विद्यार्थी परिषद (KSVP) यांसारखे नवनवीन आयामही याच काळात विकसित झाले. प्रत्येक आयामांसाठी समर्थ आणि सक्षम कार्यकर्ते चंद्रकांतदादांनी उभे केले.